OAK KULMANDAL

आम्ही ओक - आपले स्वागत करतो.

वासिष्ठेन्द्र प्रमदा भरद्वश्वेती                   
त्रिप्रवरांद्विता: वसिष्ठ-गोत्रोत्पन्न:        
यजुर्वेदस्य तैत्तिरीय-शाखांतर्गत   
हिरण्यकेशी शाखाध्यायीन:

श्री व्याडेश्वर, गुहागर

चित्पावन ब्राह्मण घराण्यांमध्ये जास्तीत जास्त घराण्यांचे कुलदैवत हे गुहागर येथील समुद्रतीरी वसलेले श्री क्षेत्र व्याडेश्वर होय.

कोकणतीरी आलेल्या पहिल्या साठ चित्पावन कुटुंबियांपैकी श्रीधर नामक ब्राह्मणाने तत्कालीन राजास विनंती करून समुद्रकाठचा दोन नद्यांमधील प्रदेश ग्राम वसवण्यास मागितला. तत्कालीन राजाने श्रीधरास ही जागा देऊन श्री व्याडेश्वराच्या पुरातन मंदिराचा जिर्णोध्दार करण्यास अनुमती दिली. व्याड नावाच्या ब्राह्मणाने मुक्ती मिळवणेसाठी हे शिवलिंग तयार केले असून तो त्याची पूजा अर्चा करून तप करीत असे त्यामुळेआ कोकणभूमीतील श्री भगवान शंकराच्या काही जागृत देवस्थानांपैकी व्याडेश्वर देवस्थान हे अतिशय महत्वाचे समजले जाते. या व्याडेश्वर देवस्थानची एक प्रचलीत आख्यायिका अतिशय मनोरंजक आहे.

कामुराजा नावाच्या राजाच्या गोशाळेतील गवळ्याला आपल्या गुराख्याबाबत संशय निर्माण झाला की आपल्या कपिला गाईचे दूध हा गुराखी चोरून पित असला पाहिजे. धुष्टपुष्ट कपिला गाय आपल्या अपेक्षेपेक्षा कमी दूध देत असल्याने, एक दिवस या गुराख्याचे बिंग फोडण्याच्या निमित्ताने त्याच्या मागे हा गवळी लपत छपत आला आणि त्याने पाहिले की, कपिला गाय एका कळकाच्या बेटामध्ये शिरली आहे. ती निश्चिंत उभी राहून एका दगडावर आपला पान्हा सोडीत होती. या दगडामागे आपला गुराखी लपला आहे असे वाटून गवळ्याने त्या ठिकाणी जोराने काठी मारली, त्याक्षणी त्या दगडातून रक्ताची धार वाहू लागली. भयभीत झालेल्या गवळ्याने धावत जाऊन हि हकीकत आपल्या राजाला सांगितली. राजा सर्व लवाजमा व अधिकारी घेऊन त्याजागी आला आणि आजूबाजूची झाडे तोडून तेथे खोदकाम चालू केले. खोदून झाल्यानंतर तेथे त्यांना एक शिवलींग दिसले. त्या बरोबर त्याने ताडले की, गुह जंगलातील व्याडेश्वराचे शिवलींग हेच असावे. यथासांग पूजाअर्चा करून ताबडतोब मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला. रात्री स्वप्नात राजाला दृष्टांत झाला की, उद्या सकाळी तुझ्या सभागृहात जो कोणी पहिला इसम येईल त्याच्या दोन पायांच्या आकाराएवढे लांब व रूंद मंदिर तू बांध. राजा अचंब्यात पडला. दुस-या दिवशी गंगाडक नावाचा यवन प्रथम सभागृहात आला तो कुबडा होता. त्याला पाहून राजाने सभेपुढे स्वप्न व दृष्टांत विशद केला. गंगाडक यवनासही अचंबा वाटला आणि त्याने राजाला हे मंदिर बांधण्याकरीता लांबी व रूंदी वाढावी म्हणून आपले दोन्ही पाय उभे चिरून दुप्पट जागा करणेस सांगितली व ती जागा मापून देऊन तो निचेष्ट पडला आणि मग त्या आकाराचे व्याडेशाचे मंदिर बांधले गेले.

चित्पावन ब्राह्मणांपैकी श्रीधर नावाच्या श्रीमंत विप्राने श्री व्याडेश्वराचा जिर्णोद्धार केला तसेच त्याची आराध्यदेवता दुर्गामाता हिच्या मंदिराचा सुध्दा जिर्णोध्दार करून तेथे एक स्तंभ उभा केला. तेव्हापासून श्रीधराने चित्पावनांसाठी वसवलेल्या गुहागर ग्रामातील सर्व चित्पावनानी श्री व्याडेश्वराला आपले कुलदैवत व दुर्गामातेला आपली कुलस्वामिनी मानले.

गुहागर गावामध्ये बस स्टॅंडचे जवळच श्री व्याडेश्वराचे हे मंदिर आहे. देवळाभोवती प्रशस्त व स्वच्छ जागा आहे व देवळाचे उत्तरेस भक्तनिवास आहे. भक्तनिवासामध्ये ८ खोल्या असून भक्तनिवासामध्ये चहा भोजनाची व्यवस्था होते. तसेच मंदिराच्या पिछाडीला असलेल्या वरचापाट रस्त्यावर बरीच निवासगृहे व भोजनगृहे झालेली आहेत.

मंदिराचे पिछाडीस श्री. चंद्रशेखर भावे रहातात त्यांच्याकडे पूजाअर्चा, अभिषेक व नैवेद्य याची व्यवस्था उत्तम होते. सर्वसाधारणपणे अभिषेक, महापूजा, दूधाचा अभिषेक, दहिभाताची पूजा व अभिषेक, लघुरूद्र व ब्राह्मणभोजन अशा स्वरुपाच्या पूजा येथे यथासांग केल्या जातात. तसेच पोस्टाद्वारे पैसे पाठवल्यास पूजा अभिषेक करून प्रसाद व अंगारा पाठवला जातो.

श्री. चंद्रशेखर भावे हे मंदिरातील नित्य पूजा व रूद्राभिषेक करतात.

या मंदिराचे वार्षिक उत्सव हे त्रिपूरी पौर्णिमा व महाशिवरात्र यावेळी केले जातात. त्रिपूरी पौर्णिमेचा उत्सव सध्या गोव्यामध्ये स्थलांतरीत झालेले मराठे कुटुंबिय करतात.

चिपळूण, रत्नागिरी, मुंबई, पुणे येथून गुहागर येथे येण्यासाठी अनेक बसेस आहेत. तालुक्याचे ठिकाण असल्याने गावामध्ये वैद्यकिय सुविधा व जागोजागी एस.टि.डि. फोनची सोय आहे.

मंदिराच्या मागे पाच मिनिंटांचे अंतरावर विस्तिर्ण व प्रशस्त समुद्रकिनारा असून नारळी पोफळीच्या बागा व निसर्ग सौंर्दयाने नटलेले गुहागर नक्किच मनाला भुरळ पाडणारे आहे.

सौजन्य - कुलदैवत : अजित पटवर्धन