OAK KULMANDAL

आम्ही ओक - आपले स्वागत करतो.

वासिष्ठेन्द्र प्रमदा भरद्वश्वेती                   
त्रिप्रवरांद्विता: वसिष्ठ-गोत्रोत्पन्न:        
यजुर्वेदस्य तैत्तिरीय-शाखांतर्गत   
हिरण्यकेशी शाखाध्यायीन:

बोडण

बोडण हा एक हिंदू चित्पावन कोकणस्थांतील कुलधर्म, कुलाचार आहे. आपल्या कुळातील चालीप्रमाणे म्हणजेच परंपरेप्रमाणे वार्षिक, त्रैवार्षिक अगर शुभकार्य झाल्यावर बोडण भरतात. बोडण हे शक्यतो मंगळवारी, शुक्रवारी किंवा रविवारी भरतात. चातुर्मास पौष व चैत्र महिना सोडून हा देवीचा धार्मिक कार्यक्रम करतात.

तीन किंवा पाच सुवासिनी व एक कुमारीका यांना तेल शिकेकाई देऊन, सुस्नान होऊन सोवळ्याने म्हणजेच रेशमी वस्त्र नेसून सर्व सौभाग्य अलंकार लेवून येण्यास सांगितले जाते. सर्वांचे पाट गोलाकार मांडून मधोमध एक पाट अगर चौरंग ठेवून ठराविक पद्धतीचीच रांगोळी काढायची असते. बोडण भरण्यास पितळी परातच लागते. ती चौरंगावर ठेवतात. आल्याबरोबर सुवासिनींची व कुमारीकेची तुळशीपुढे पूजा होते. प्रथम तुळशीची पूजा, ओटी व नंतर आलेल्या महिलांची व कुमारीकेची गरम पाणी व दूध पायावर घालून ओटी भरतात. त्यानंतर लगेच त्या बोडण भरण्यास बसतात. आपल्या देवघरातील अन्नपूर्णा काढून ती बोडणाच्या परातीत ठेवतात तिची पूजा करण्याआधी प्रथम सुपारीचा गणपती करून त्याची पंचामृती पूजा करतात. देवीसाठी कणिक दुधात साखर घालून भिजवून त्याचे देवीला छोटे छोटे दागिने करतात. त्याचेच सिंहासन व हराडेरा दुधासाठी करतात. त्याच कणकेचे पाच छोटे छोटे दिवे आरतीसाठी करतात. देवीची घरच्या मालकिणीने पंचामृती पूजा करायची असते. देवी भोवती पुरणपोळीवर सर्व पदार्थ वाढून पाच नैवेद्य मांडले जातात. यावेळी नैवेद्य पुरण घातलेच पाहिजे. नैवेद्य दाखवून कणकेच्या दिव्यांनी दुर्गादेवीची आरती म्हणायची. नंतर ते पाच दिवे परातीत प्रत्येक नैवेद्याजवळ ठेवायचे. घरातील दुसऱ्या बाईने चांदीच्या संध्येच्या पालीस सोन्याची साखळी गुंडाळून त्याने दूधाची धार सोडून ते शांत करायचे असतात. या पूजेसाठी जसे पुरण हवे तसे पंचामृत (दूध, दही, तूप, मध, साखर), एक ते दोन भांडी तरी हवेच. दिवे शांत झाल्यावर देवी वर पाच पळ्या प्रत्येकी दूध दही वैगेरे घालायचे. घराच्या मालकिणीने सर्वांचे हात बोडण कळवण्यास लावावे. आपण बोडण कळवण्यास सुरुवात करावी. कुमारीकीने देवी, पैसा सुपारी त्या बोडणातून काढावी. देवीच्या तोंडास पुरण किंवा साखर लावून देवी देवघरात ठेवावी. पुरण सवाष्णीच्या हातास लावून त्यांचे हात थांबवावेत. परातीतील बोडण चमचाभर काढून घेऊन सर्व माणसांना अंगारा म्हणून लावतात. ते बोडण नंतर डब्यात, पातेल्यात घालून गैस खायला घालतात. ते इतर कोणत्याही जनावरास घालायचे नसते तसेच टाकून द्यायचे नसते.

बोडण हा धार्मिक कुलाचार चित्पावन ब्राह्मणांमध्ये असून इतर कोणत्याही ब्राह्मण पोटजातीत तो आढळत नाही. देवीने महिषासुरासारख्या अनेक राक्षसांचा नाश समुद्रकाठच्या परिसरात केला आहे. त्यावेळी तिला अनेक रूपे धारण करावी लागली. राक्षसांना आटोपणे हे काम अतिशय ताकतीचे व बुद्धीचे होते ते देवीने करून समाजाची त्रासातून सुटका केली. दैवी सुख समृद्धीचा लाभ तिच्यामुळे मिळाला म्हणून तिला शांत व प्रसन्न करण्यासाठी तिची हि पूजा. भक्तीभाव अर्पण करण्याचा हा सोहळा आहे. तिच्या कृपेने सर्व खाद्यपदार्थ, अलंकार व वनवैभव यांची रेलचेल आहे व होणार याचे प्रतिक आहे. या परंपरेमध्ये अंधश्रद्धा, उधळ माधळ, बेफिकिरी, सोवळ्याचा बहिष्कार असे अजिबात नाही. उलट वैज्ञानिक दृष्टीकोन बघता तुळस हि आरोग्यदृष्ट्या महत्वाची म्हणून तिची पूजा. दोन तीन पिढ्यांचे सान्निध्य व मुलांकर संस्कार व जिच्यापासून गोरस मिळते तिच्याबद्दल कृतज्ञता असा यात डोळसपणा आहे. चित्पावन ब्राह्मणांना आवडणारे असे हे धार्मिक मनोरंजक सुख समृद्धीचे द्योतक असे मंगलकार्यच आहे.

सौजन्य - कुलदैवत : अजित पटवर्धन