वासिष्ठेन्द्र प्रमदा भरद्वश्वेती
त्रिप्रवरांद्विता: वसिष्ठ-गोत्रोत्पन्न:
यजुर्वेदस्य तैत्तिरीय-शाखांतर्गत
हिरण्यकेशी शाखाध्यायीन:
चित्पावन ब्राह्मणांव्यतिरिक्त मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेचे महत्व अन्य कोणत्याही भारतातील इतर ब्राह्मण ज्ञातीमध्ये दिसून येत नाही. ' मासानाम् मार्गशीर्षोSहमस्मि' असे भगवान श्रीकृष्ण भगवदगीतेमध्ये सांगतात. सर्व मासात मार्गशीर्ष मास श्रेष्ठ असा याचा अर्थ.
देवदिवाळी हा सण म्हणजे आपल्या कुलदैवताला, ग्रामदैवताला व उपास्यदेवतेला भजण्याचा दिवस. य दिवशी सर्व चित्पावन ब्राह्मणांच्या घरी वडे व घारग्याचा नैवेद्य दाखवला जातो. त्या दिवशी सर्व देवांचे नैवेद्य वेगवेगळ्या पानांवर दाखवले जातात. त्याबरोबर पितरांकरता नैवेद्याचे पान करून त्याचा पण नैवेद्य दाखवतात. कुलदैवताच्या नावाने दाखवलेल नैवेद्याचे पान हे घरात प्रसाद म्हणून घेतले जाते आणि इतर सर्व नैवेद्याची पाने ही घराबाहेर गुरवास दिली जातात अथवा गाईस घातली जातात.
आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशीपर्यंत चातुर्मास पाळला जातो. हे चार महिने देवांची रात्र समजली जाते. उत्तर ध्रुवाच्या आसपास वेदांची निर्मिती झाली तेथे चार महिने अंधार असे आणि बाकी आठ महिने उजेड असे. त्यामुळे हे चार महिने देवभूमीवरील प्रदिर्घ रात्र अथवा देवांची रात्र असे मानले जात असावे.
कार्तिकी एकादशी नंतर येणारी पहिली प्रतिपदा ही मार्गशीर्ष महिन्याची व रात्र संपल्यामुळे ह देवभूमीवरील आनंदोत्सवाचा दिवस आणि त्यामुळे ही देवदिवाळी.
या कुळाचारामुळे आपणांस कुलदेव, कुलदेवता, ग्रामदेवता यांचे स्मरण होते व आपल्या पूर्वजांच्या व देवतांच्या करीता नैवेद्य समर्पणाच्या निमित्ताने ही आठवण जागृत ठेवणे हा या कुळाचाराचा हेतू होय. प्रत्येकाने कुठल्याही देवताची पूजा करावी, पोथ्या वाचाव्यात व इतर कुठलीही धार्मिक कार्य आपल्या आवडीप्रमाणे व सवडीप्रमाणे करावीत.
परंतू कुलदेवत व कुलदेवी यांचे कदापिही विस्मरण होऊ देऊ नये. हिंदू रिवाजाप्रमाणे घरातील कर्ता जशी आपल्या सर्व कुटुंबाची देखभाल करतो, चरीतार्थ चालवतो तसेच कुलदेव व कुलदेवी आपल्या घराण्याची काळजी वाहतात व देखभाल करतात.
सौजन्य - कुलदैवत : अजित पटवर्धन