OAK KULMANDAL

आम्ही ओक - आपले स्वागत करतो.

वासिष्ठेन्द्र प्रमदा भरद्वश्वेती                   
त्रिप्रवरांद्विता: वसिष्ठ-गोत्रोत्पन्न:        
यजुर्वेदस्य तैत्तिरीय-शाखांतर्गत   
हिरण्यकेशी शाखाध्यायीन:

श्री महालक्ष्मी पूजा

चित्पावन ब्राह्मण कुटुंबियांमध्ये नवरात्रातील अष्टमीच्या दिवशी महालक्ष्मीची पूजा केली जाते. पूर्वी ही पूजा घरोघरी केली जात असे पण हल्ली जागेच्या अडचणीमुळे सार्वजनिक ठिकाणी, कार्यालय, हॉल किंवा मंदिराच्या प्रागंणामध्ये महालक्ष्मी बसवतात व सर्व भगिनी तिच्या दर्शनासाठी जातात. लग्न झाल्यावर पहिली पाच वर्षे महालक्ष्मीची पूजा करतात व कमीत कमी पाच घागरी फुंकतात.

सकाळी घरी ब्राह्मण बोलावून पंचोपचारी पूजा करतात. त्यावेळी १६ पदरी रेशीम घेऊन त्याला गाठी मारतात. पहिले वर्ष असेल तर एक गाठ, पाचवे वर्ष असेल तर पाच गाठी मारून हा तातू तयार करतात. जवळच्या पाणस्थळावरून एक खडा आणायचा. तसेच मुळांसकट दुर्वा आणून व पाटावर रांगोळी घालून या तिन्ही गोष्टी व तांदूळ त्यावर ठेवून ब्राह्मणाद्वारे याची पंचामृती पूजा करून हा रेशमी तातू हातात बांधतात.

संध्याकाळी महालक्ष्मीची (मुखवटयाची) पूजा करायची व हातातला तातू महालक्ष्मीच्या पायावर वहायचा व नंतर पाच घागरी फुंकायच्या म्हणजे ही पूजा पूर्ण होते. महालक्ष्मीचा मुखवटा हा पुरूषांनी तयार करायचा असतो. हा मुखवटा तयार करताना कोणत्याही स्त्रीने पहायचा नसतो.

स्नान करून, सोवळे नेसून झाल्यावर तांदूळ दळले जातात व या पिठाची उकड करतात. या उकडीचा मुखवटा करून त्याला कापडी हात वैगेरे करून अंगावर दागिने घालून तिला (देवीला) वस्त्र नेसवून तयार करतात व त्यावर मुखवटा बसवतात. नंतर षोडशोपचारी पूजा केली जाते व त्यावेळी घागरी फुंकतात. या वेळी जिच्या अंगात देवी संचारते त्या सवाष्णीला कोणी कोणी प्रश्न विचारतात. हा कार्यक्रम रात्री उशीरा (साधारणपणे मध्यरात्री) पर्यंत चालतो.

सौजन्य - कुलदैवत : अजित पटवर्धन