वासिष्ठेन्द्र प्रमदा भरद्वश्वेती
त्रिप्रवरांद्विता: वसिष्ठ-गोत्रोत्पन्न:
यजुर्वेदस्य तैत्तिरीय-शाखांतर्गत
हिरण्यकेशी शाखाध्यायीन:
भक्तजनांवर देवीची कृपा रहावी, सुखसमृद्धिची वृद्धि व्हावी, अरीष्ट टाळावे याकरीता अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत नवरात्र करण्याची प्रथा आहे.
अष्टभुजा देवीने महिषासुर दैत्याच वध करून भक्तजनांना अभय दिले. त्यांचे रक्षण केले. हे युद्ध नऊ दिवस चालले होते अशी आख्यायिका आहे. अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना करतात. प्रथम घरातील देवांची पूजा करू घट बसवावा.
एक छोटा पाट घेऊन त्यावर गहू पसरून त्यावर पाण्याने भरलेला तांब्या ठेवावा. पाण्यामध्ये नाणे व सुपारी ठेवावी. या तांब्यावर एक ताम्हन ठेवून त्यावर गहू पसरावेत व त्यावर देवीचा टाक ठेवावा. काही ठिकाणी ताम्हन व देवीचा टाक न ठेवता तांब्यावर नारळ ठेवतात. नारळ ठेवताना आंब्याची पाने बाजूने लावावीत. पाटापुढे शंख व घंटा ठेवावी व हळदकुंकू, अक्षता, गंध, फूल यांनी पूजा करावी. वासाच्या फुलांची माळ करून त्यावर सोडावी. याप्रमाणे नऊ दिवस नऊ माळा घालाव्यात. एखाद्या तिथीचा क्षय असेल तर त्या दिवशी दोन माळा सोडाव्यात.
या दिवशी गव्हाचे महत्व असते. त्यामुळे पाटापुढे पत्रावळ ठेवून त्यावर चाळलेली माती घालावी. त्यात गहू पेरून पाणी घालावे. त्याप्रमाणे काही ठिकाणी इतर धान्य ही पेरतात.
नवरात्रात नऊ दिवस चोवीस तास समई तेवत ठेवावी.
ललितापंचमीला घटावर सायंकाळी पापड्या, करंज्या, गोड वडे यांचा फुलोरा टांगतात. काही घरात अष्टमीच्या दिवशी देवीसमोरे होम करतात. नवमीपर्यंत दुर्गापाठ, सप्तशतीपाठ किंवा भागवताचे वाचन करतात.
तसेच काही घरात रोज सोवळ्याने स्वयंपाक करून नऊ दिवस सवाष्ण व ब्राह्मणभोजन असते.
नवरात्र उठतेवेळी प्रथम देवाची पूजा करून घटाला माळ घालून आरती करावी. नंतर माळा उतरवाव्यात. ताम्हनातील देवीच्य़ा टाकाची देवांत स्थापना करावी व पूजा करावी.
जेवावयाचा नैवेद्य दाखवून पुरणाचे दिवे करून आरती करावी. पुरणाचे दिवे नऊ, सात किंवा पाच करतात. त्यामध्ये एक दिवा मोठा करतात. मोठ्या दिव्यात पाच वातींचा जुडगा घालावा.
नवरात्रात रोज संध्याकाळी देवीची आरती करतात व त्यावेळेस दूध साखरेचा किंवा एखाद्या फळाचा नैवेद्य दाखवून तो प्रसाद सर्वाना देतात.
एकदा घट बसविल्यावर नऊ दिवस तो हलवू नये व तसेच नंदादीपसुध्दा जागेवरून हलवू नये. काही ठिकाणी पत्रावळीवर तयार केलेल्या शेतात घट बसवतात.
सौजन्य - कुलदैवत : अजित पटवर्धन