OAK KULMANDAL

आम्ही ओक - आपले स्वागत करतो.

वासिष्ठेन्द्र प्रमदा भरद्वश्वेती                   
त्रिप्रवरांद्विता: वसिष्ठ-गोत्रोत्पन्न:        
यजुर्वेदस्य तैत्तिरीय-शाखांतर्गत   
हिरण्यकेशी शाखाध्यायीन:

श्री. दुर्गादेवी गुहागर

श्री. नवदुर्गादेवी,वरला पाट, गुहागर

श्री नवदुर्गादेवी हि त्रिगुणात्मक असून श्री महाकाली (शक्तीदात्री) श्री महालक्ष्मी (एश्वर्यदात्री) व श्री महासरस्वती(बुद्धिदात्री) यांचे एकवटलेले स्वरूप आहे.

श्री. रघुनाथ पित्रे यांनी लिहिलेल्या वाडेश्वरमहात्म्य ग्रंथामध्ये नमूद केले आहे की, श्रीधर या योगीपुरूषाने गुहागर ग्राम निर्माण केले व पुरातन कालापासून असलेल्या दुर्गादेवीच्या मंदिराची जागा बदलून जवळजवळ तीनशे फूट आत या मंदिराची स्थापना केली.

ज्या ठिकाणी पुरातन मंदिर होते तेथे एका धर्मस्तंभाची स्थापना केली. या धर्मस्तंभाचा पूर्वी वादामध्ये न्यायनिवाडा करण्यासाठी व देवीकडून कौल घेण्यासाठी उपयोग केला जात असे.

हबश्यांच्या व यवनांच्या त्रासामुळे दग्ध झालेल्या व विध्वंस झालेल्या मूर्तीच्या जागी नवीन संगमरवरी मूर्तीची स्थापना करण्यात आली व हे अतिशय पुरातन देवस्थान गुहागर येथे नवाग्राम वसवल्यानंतर आलेल्या चित्पावन घराण्यांनी आपले दैवत मानले व श्री नवदुर्गादेवी हि येथील अनेक चित्पावन कुटुंबियांची कुलस्वामिनी झाली. श्री नवदुर्गादेवी हि दशभुजा असून आपल्या भक्तांचे सर्व संकटापासून रक्षण करते.

या देवीची सकाळी, माध्यान्ही व सायंकाळी अशी तीन रुपे असतात. मराठवाडयातील चित्पावनांची कुलस्वामिनी श्री देवी अंबेजोगाई चे मूळ पीठ हे श्री नवदुर्गादेवी होय. श्री नवदुर्गादेवीचे मंदिर हे गुहागर बस स्थानकापासून सुमारे दीड ते दोन कि.मी. अंतरावर आहे. मंदिराचे आवार विस्तीर्ण असून रस्त्यावरील देवीच्या खांबापासून आत सरळ चालत आल्यावर सुमारे तीनशे फुटावर देवीचे मंदिर आहे. मुख्य मंदिराशेजारी लक्ष्मी नारायणाचे व शंकराचे मंदिर आहे. मंदिराच्या मंडपावर भक्तनिवास असून बाजूला धर्मशाळा आहे. मंदिराच्या ईशान्येस मोठे तळे आहे.

या देवस्थानचे वार्षिक उत्सव हे चैत्र शुद्ध प्रतिपदा ते रामनवमीपर्यत वासंतिक नवरात्र व आश्विन शुद्ध प्रतिपदा ते विजयादशमीपर्यत शारदीय नवरात्र होत. श्री. चंद्रशेखर जोशी करीत असून त्यांचे निवासस्थान देवस्थानच्या आवारातच आहे. पोष्टाने पैसे पाठवून गुरूंजीकरवी भक्तजनांना काही सेवा करायची असेल तर अध्यक्ष, दुर्गादेवी देवस्थान फंड, वरला पाट, गुहागर, जि. रत्नागिरी किंवा श्री. चंद्रशेखर जोशी यांचेकडे पाठवावेत योग्य ती सेवा करून अंगारा प्रसाद पाठविला जातो.

अनेक चित्पावन घराण्याची असलेली श्री योगेश्वरी, अंबेजोगाई हिचे मूळ पीठ हे श्री नवदुर्गादेवीचे होय. श्री नवदुर्गादेवी, श्री वैजनाथाबरोबर लग्न करण्यासाठी परळी वैजनाथाला निघाल असताना काही कारणामुळे तिला उशीर झाला व ती अंबेजोगाई पोहोचेपर्यंत रात्र झाली व गोरजमुहुर्ताची वेळ टळून गेल्यामुळे श्री वैजनाथ कैलासावर निघून गेले. त्यामुळे श्री नवदुर्गादेवीने अंबेजोगाई येथे वास्तव्य केले व तेथे कुमारीकेच्या रुपाने स्थित झाल्याने व त्या क्षेत्रस श्री. योगेश्वरीदेवी अंबेजोगाई असे नाव ठेवले व अनेक कोकणाबाहेर गेलेल्या चित्पावनांची हि कुलस्वामिनी झाली अशी आख्यायिका आहे.

श्री चंद्रशेखर जोशी यांचेकडे भक्तनिवासातील भक्तांची चहाभोजनाची व्यवस्था होते. तसेच गुहागर गावामध्ये अनेक निवासगृहे आहेत.

सौजन्य - कुलदैवत : अजित पटवर्धन