वासिष्ठेन्द्र प्रमदा भरद्वश्वेती
त्रिप्रवरांद्विता: वसिष्ठ-गोत्रोत्पन्न:
यजुर्वेदस्य तैत्तिरीय-शाखांतर्गत
हिरण्यकेशी शाखाध्यायीन:
श्री. त्र्यंबकेश्वर मंदिर हे साधारण ३५० ते ४०० वर्षे जुने शिवमंदिर आहे. हे मंदिर बदलापूर गाव (जि. ठाणे) येथे एका तलावानजीक आहे. या मंदिराजवळच एक दगडांचे बांधकाम असलेली विहिर आहे. जुन्या मंदिराच्या (जे आता अस्तित्वात नाहि) बांधकामात लाकडाचा वापर केला गेला होता. त्याच्या भिंती या विटा व मातीच्या सहाय्याने उभारल्या होत्या.
या मंदिरात श्री गणेश, सूर्यदेव, काळभैरव, विठ्ठल रखुमाई आणि देवी आदिंच्या मूर्ती आहेत. शिवलिंगासमोर सर्वसाधारणपणे आढळते तशी नंदिची मूर्ती आहे.
असे आढळून येते कि या मंदिराचा अनेकदा जिर्णोध्दार झाला असावा. शिवलिंग, नंदि व कालभैरव यांच्या मूर्ती सोडून इतर सर्व मूर्ती १९७५ साली बदलण्यात आल्या. श्री. भाऊ परांजपे यांनी श्री गणेशाची मूर्ती तर देवीची मूर्ती श्री. रमाकांत ओक यांनी स्थापन केल्या. श्री पद्माकर ओक यांनी विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीची स्थापना केली. त्याचप्रमाणे १९५५ मध्ये नजीकच्या हनुमान मंदिराचाहि जिर्णोध्दार करण्यात आला.
विविध वार्षिक उत्सव जसे त्रिपूरी पौर्णिमा, गोकुळाष्टमी या सारखे उत्सव येथे साजरे केले जातात. महाशिवरात्रीच्या काळात येथे किर्तन सप्ताह असतो.सुमारे ७० वर्षापूर्वी पर्यंत येथे हरदासी किर्तन होत असे त्याचप्रमाने किर्तनकार सातही दिवस गावात येऊन राहत असत. त्यानंतर येथे वारकरी किर्तन होऊ लागले.श्री. सद्गुरू वामनराव पै, श्री. अरूण भावे, श्री. मामासाहेब दांडेकर, श्री. सोहोनी, श्री.भातखंडे यांसारख्या दिग्गजांची येथे किर्तने झाली आहेत. श्री. मधुसुदन दातार गेली ५५ वर्षे येथे दरवर्षी किर्तन करीत आहेत.
वंशपरंपरेनुसार, कोळथरे बदलापूर - थोरली पाती यांच्याकडे या मंदिराची व्यवस्था बघण्याची जवाबदारी आहे. सन १९५२ मध्ये ट्रस्टची स्थापना करण्यात आली. तत्कालीन ट्रस्टीमध्ये स्व.श्री. पद्माकर ओक, स्व.श्री.दिवाकर ओक आणि स्व.श्री.नारायण ओक यांचा समावेश होता. त्यांच्या पश्चात श्री. भास्कर (नितीन) ओक व श्री. प्रसाद ओक याचा कारभार बघतात. सध्या या मंदिराचा जिर्णोध्दार करणे चालू आहे. जिर्णोध्दारानंतर मंदिरास सुमारे १५०० स्क्वे.फूटांचा सभामंडप असेल. मंदिराच्या कळसावर वारकरी संप्रदायातली विविध संताच्या मूर्ती बरोबरच श्री वसिष्ठ ऋषींची मूर्ती कोरण्यात आली आहे.